उपरोक्त शासन निर्णयान्वये सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना वस्तुरूपात देण्यात येणाऱ्या अनुदान रुपये 20,000/- इतकी रक्कम वधूचे वडील, आई किंवा पालकांना धनादेशाद्वारे देण्यात येते. तसेच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यांमागे रुपये 4000/- प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते.
पात्रतेचे निकष :
- वधू व वर महाराष्ट्र राज्याचे अधिवासी (Domicile) असले पाहिजेत.
- नवदांपत्यांतील वधू / वर यापैकी दोन्ही किंवा एकजण हे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील असावेत.
- दांपत्यापैकी वराचे वय 21 व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये.
- वधू व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय असेल. तसेच सदरील योजनेचा लाभ विधवा महिलेस दुसऱ्या लग्नाकरिता देखील अनुज्ञेय राहील.
- जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले असावे.
- बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य / कुटुंब यांचेकडून झालेला नसावा, याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणे आवश्यक आहे.
- आंतरजातीय विवाह असल्यास त्यासाठी शासन निर्णय क्र. युटीए-१०९९/प्र.क्र.४५/मावक-२, दिनांक ३० जानेवारी, १९९९ नुसार जे फायदे मिळतात तेही फायदे अनुज्ञेय राहतील.
सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था / यंत्रणेचे निकष खालीलप्रमाणे.
- स्वयंसेवी संस्था/यंत्रणा, स्थानिक नोंदणी अधिनियम, 1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1850 अंतर्गत नोंदणीकृत असावी.
- सामुहिक विवाह सोहळ्यासाठी किमान 10 दांपत्ये (20 वधू व वर) असणे आवश्यक राहील.
- सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी क्षेत्रबंधन लागू होणार नाही.
- सामुहिक विवाहासाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था / यंत्रणा सेवाभावी असावी, व्यावसायिक नसावी.
- सेवाभावी संस्था / यंत्रणेने आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये केला जाणारा खर्च हा संस्थेने करावा. त्यासाठी संस्था पुरस्कर्ते शोधू शकेल. मात्र अशा कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
अर्ज कसा करावा :
- ज्या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह करावयाचा आहे त्या संस्थेमध्ये शासन निर्णयात दिलेल्या अर्जाच्या नमून्यानुसार शासन निर्णयात नमूद निकषानुसार परिपूर्ण अर्ज सादर करावा.
- सदर संस्थेमार्फत एकूण प्राप्त अर्ज विवाह संपन्न होण्याच्या 15 दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावे.
या कार्यालयामार्फत सन 2022-2023 मध्ये स्वयंसेवी संस्थेमध्ये भाग घेवून विवाह करणाऱ्या अनुसूचित जातीच्या 40 जोडप्यांना एकूण 9,60,000/- रुपयेचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.
संपर्क:
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर