स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी मेहतर समाजातील लोक सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. हे काम करीत असतानाच ते स्वतःची मुले बरोबर घेऊन जात असतात कारण त्यांची मुले सांभाळण्यासाठी घरी तशी सोय नसते. त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित होऊ नयेत, या कारणास्तव मुलांची स्वतंत्रपणे शिक्षणाची सोय करण्यासाठी शिक्षण खात्याच्या पद्धतीने पुणे व नागपूर येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींसाठी इयत्ता पहिली ते दहावी करिता निवासी शाळा सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच राहण्याची व जेवणाची व्यवस्था, गणवेश अंथरूण-पांघरूण, लेखन सामग्री इत्यादी मोफत पुरवल्या जातात. सफाई कर्मचाऱ्यांचे मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा नागपूर ही १९९६ रोजी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ती काही कारणांनी बंद पडली. २०१० - २०२१ पर्यंत तब्बल ११ वर्षे ही शाळा बंद होती.
नागपूर शहरातील वाठोडा भागातील सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी २०२१-२२ पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या शाळेचे वैशिष्ट म्हणजे पूर्ण इंग्रजी माध्यमातून नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. या सफाई कामगारांच्या मुलांना व मेहतर समाजाच्या मुलांना प्रवेश दिला जातो.